Ad will apear here
Next
डबिंगच्या गमतीजमती
अमिताभ बच्चन ह्यांची एखादी जाहिरात टीव्हीवर सुरू होते आणि ते शुद्ध मराठीमध्ये बोलत असतात. आपोआप मनात प्रश्न येतो, त्यांना मराठी येत असेल काय?

मराठीच नव्हे तर गुजराती, तमीळ, तेलुगू आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ते बोलताना दिसतात. इतक्या भाषा ते बोलू शकतात का?

... ही करामत असते डबिंग इंडस्ट्रीची.

अनेक वर्षांपासून मी मराठी जाहिराती लिहीत आहे. आजवर पाच हजारांहून अधिक जाहिराती लिहून झाल्या. अनेक हिंदी-मराठी अभिनेत्यांच्या आवाजात त्या रेकॉर्ड केल्या. सर्वांत उत्तम अनुभव आला तो अमिताभ ह्यांना मराठी संवाद शिकवताना.

एका जाहिरातीमध्ये त्यांनी स्वतः अभिनय केला होता. मूळ जाहिरात हिंदीमध्ये शूट आणि डब झाली होती. तीच मराठीमध्ये डब करायची होती. क्लायंटचा आग्रह होता अमिताभ यांनी स्वतः मराठीमध्ये डब करावं. मराठी स्क्रिप्ट माझी असल्याने मला बीआर स्टुडिओमध्ये बोलावलं होतं. वेळ होती सकाळी आठची. हो, अमिताभ बच्चन डबिंगचं काम सकाळी करतात. त्यानंतर इतर शूट सुरू होतात.

अमिताभ ह्यांची खासियत म्हणजे ते दिलेल्या वेळेवर बरोबर पोहोचतात.

ठरल्यानुसार ते सकाळी आठ वाजता स्टुडिओमध्ये आले. जाहिरातीची स्क्रिप्ट त्यांनी हातात धरली. हिंदी आणि मराठीची लिपी देवनागरी असल्यामुळे त्यांना मराठी स्क्रिप्ट वाचता येत होती. मग मी एक एक ओळ वाचत गेलो आणि त्यांनी माझ्या पाठोपाठ ती ओळ म्हणून दाखवली. बऱ्याच ओळी ते बरोबर म्हणत होते.

आमची रिहर्सल चालली होती; पण ते ‘च’चा उच्चार हिंदी ‘च’सारखा करत होते. मग मी मराठी ‘च’ म्हणून दाखवत होतो आणि ते फॉलो करत होते.

शेवटी अचानक थांबले आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘लोणचं’वाला ‘च’ बोलना हैं क्या?’

मी स्तंभित झालो. त्यांना लोणचं शब्द माहीत होता!! मी होकार दिल्यावर त्यांनी मराठी ‘च’चा अचूक उच्चार केला आणि त्यांच्या दमदार आवाजात जाहिरात रेकॉर्ड झाली.

सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं काम अतिशय शिस्तबद्धपणे चालतं.

अमिताभ ह्यांनी अनेक चढ-उतार पहिले. आजारपणं सोसली; पण आजही त्यांचा कामाचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांच्या आवाजाची जादू आजही टिकून आहे. आपलं काम ते अचूक बजावतात. जराही तडजोड न करता. अमिताभ ह्यांनी सिनेव्यवसायात नोंदवलेले विक्रम सर्वांना माहीत आहेत. जाहिरात व्यवसायातही त्यांनी नोंदवलेले विक्रम खुद्द जाहिरात उद्योगाला अचंबित करणारे आहेत. जाहिरात टीव्हीवरून झळकू लागल्यानंतर आठवड्यानंतर प्रॉडक्टचा खप वाढतो हा अनुभव आम्हाला होता. अमिताभ ह्यांनी बीपीएलच्या जाहिरातींपासून मॉडेलिंग सुरू केलं. बीपीएल अचानक सर्वांत मोठा ब्रँड बनला. पुढे अमिताभ ह्यांच्या जाहिरातींनी प्रचंड जादू केली. त्यांनी केलेल्या जाहिरातींच्या प्रॉडक्टचा खप अक्षरशः काही तासांमध्ये वाढायला लागला.



अमिताभ ह्यांची प्रतिभा जशी अनुभवली तशी माधुरी दीक्षितचीही प्रतिभा मी पाहिली. माधुरीला मराठी संवाद शिकवावे लागले नाहीत. एका टेकमध्ये रेकॉर्डिंग झालं; पण माझ्यानंतर तिने तीच जाहिरात बंगाली, तामिळ भाषेत केली तेव्हा मात्र आश्चर्य वाटलं. राणी मुखर्जीला मी मराठी संवाद शिकवले तेव्हा तिला मराठी ‘ळ’ चा उच्चार करता आला नव्हता. शेवटी तिच्यासाठी मराठी डबिंग आर्टिस्टचा आवाज वापरला. सध्या मोहन जोशी ह्यांच्या आवाजातील ‘ब्रू’ कॉफीची जाहिरात टीव्हीवर दिसते. ह्यात त्यांनी भूमिका केलेली नाही. सहसा ते फक्त डब करत नाहीत; पण ब्रूच्या हिंदी जाहिरातीत नसिरुद्दिन शाह ह्यांचा आवाज आहे. म्हणून मराठीत मोहन जोशी ह्यांनी संवाद म्हणावेत, असा क्लायंटचा आग्रह होता.

एकदा नाना पाटेकर, अभिनय देव आणि मी एक डबिंग करत होतो. टेक झाल्यावर स्टुडिओमध्ये गप्पा मारत होतो. तेव्हा अभिनय म्हणाले, ‘बाबा (रमेश देव) सध्या एक स्क्रिप्ट लिहीत आहेत. ह्या वयातही त्यांना काम करत राहावंसं वाटतं.’

त्यावर नाना म्हणाले, ‘देवाला मरण नसत रे!!’

असाच आश्चर्याचा धक्का दिला विद्या बालन ह्यांनी.

‘Nirenji ...show me the script’ असं त्यांनी म्हटल्यावर मी स्क्रिप्टची एक प्रत त्यांच्या हातात दिली आणि एक माझ्या हातात ठेवली.

रिहर्सल करायला सुरुवात झाली आणि मी काही बोलायच्या आधीच त्यांनी भराभर मराठी संवाद वाचून दाखवले.

... आणि म्हणाल्या, ‘मी मुंबईकर आहे ना... मराठी येतं.’

मग टेक ३० मिनिटांत पूर्ण झाला.



सर्वांत गमतीशीर अनुभव आला एका आमदाराचं रेकॉर्डिंग करताना. लोकसभा निवडणुकीत मी एका वेळी तीन पक्षांच्या जाहिराती केल्याची ख्याती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर मला संपर्क केला. मी ती असाइनमेंट स्वीकारली. कारण त्याच वेळी मी त्यांच्या पक्षाच्याही जाहिराती बनवत होतो. आमदार महाशयांच्या आवाजात डबिंग करायचं ठरवलं. ते स्टुडिओमध्ये आले सोबत दोन बॉडीगार्ड घेऊन. अंगावर भरपूर दागिने होते आणि डबिंग रूममध्ये बॉडीगार्डसोबत शिरले. शेवटी मी त्यांना सांगितलं, ‘बॉडीगार्डने नुसता पाय हलवला, तर माइक तोही आवाज पकडतो तेव्हा त्यांना बाहेर बसवा.’ पण महाशय ऐकायला तयार होत नव्हते.

त्यांनी बॉडीगार्डला सांगितलं, ‘आवाज करायचा नाही बरं का. गुमान बसायचं!’

शेवटी ते बॉडीगार्ड गुमान बसले आणि आमदार महाशयांनी भाषण सुरू केलं. शेवटी त्यांना थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं, की स्क्रिप्ट तयार आहे. आपली फिल्म फक्त ६० सेकंदांची आहे. मी जी स्क्रिप्ट देतो तेवढीच वाचा. कसेबसे ते तयार झाले.

रेकॉर्डिंग सुरू झालं आणि मागे बसलेल्या बॉडीगार्डने त्यांचा मोबाइलवर फोटो काढला. त्याचा क्लिक आवाज माइकने पकडला . मला आणि साउंड इंजिनीअरला कळलं; पण त्यांना कळलं नाही. आम्हालाही त्यानंतर शूटला जायच होतं. म्हणून आम्ही ती फिल्म क्लिकसह तशीच रिलीज केली. ते संवाद म्हणत आहेत आणि मध्येच क्लिक आवाज येत आहे, असंच टीव्हीवर दिसत होतं. क्लिक आवाज जितक्या सहजपणे येतो, तितक्या सहजपणे ते निवडूनही आले!!

मी लहान मुलं, तरुण मुलं, फीमेल आर्टिस्ट, वयस्कर डबिंग आर्टिस्टसोबत काम करतो. प्रत्येक जण अत्यंत सफाईने काम करतात. लहान मुलं तर पहिल्या टेकमध्ये परफॉर्म करतात तेव्हा आश्चर्य वाटतं. जाहिरातीचं डबिंग ही एक अशी कला आहे, जिथे मोजक्या सेकंदांत खूप काही सांगायचं असतं.

ही कला शिकवण्याचं काम आम्ही करतो. नवीन मुलं येतात तेव्हा एक गोष्ट जाणवते, की नव्या तंत्राची त्यांना चांगली जाण असते. शिबीर चालू असताना त्यांना रेकॉर्डिंग रूममध्ये नेलं की ते माइकवर सफाईदारपणे परफॉर्म करतात.

जाहिरात क्षेत्र आता विस्तारत चाललं आहे. त्यामुळे सतत नवीन कलाकारांना वाव मिळतो. जे नवीन येतात त्यांना आम्ही योग्य मार्गदर्शनही करतो. 

- निरेन आपटे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZUJECW
Similar Posts
लंडनच्या आजीबाई ‘बेळगाव, निपाणी, कारवार आणि लंडनसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे अशी घोषणा आता द्यायला हरकत नाही,’ असे आचार्य अत्रे ह्यांनी एकदा गमतीने म्हटले होते.
मी कॉपीराईटर आणि पत्रकार! सेक्स, बलात्कारापासून ते सामाजिक विषयांवर मी लिहित असून महाराष्ट्रातील आणि परदेशातील विविध ग्रुप्सने पसंती दिली आहे. अनेकांनी माझा व्यवसाय विचारला आहे.
शेवटचे स्टेशन कुडाळ!! आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो तेव्हा अनेक स्टेशनांची अनाउन्समेंट ऐकू येते आणि शेवटी आपले स्टेशन येते. अनेक स्टेशन्स पालथी घातल्यावर आपले मुक्कामी स्टेशन येते. इथे विसावा असतो. कल्याण सोडून असा विसावा कुडाळमध्ये घ्यावा असे मला वारंवार वाटत आहे.
सैनिकांची मावशी : अनुराधाताई ‘मी तिरंगा फडकवून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!’ अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाउंडेशन करत आहे आणि ह्या फाउंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी नावाने ओळखतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language